आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) गुजरातमधील वडोदरा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तिकीट मिळालेल्या भाजप खासदार रंजनबेन भट्ट (Ranjanben Bhatt) यांनी शनिवारी वैयक्तिक कारणांमुळे उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ‘X’ वर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
रंजनबेन भट्ट यांनी वैयक्तिक कारण सांगून उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली. त्यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, “मी रंजनबेन धनंजय भट्ट, वैयक्तिक कारणांमुळे 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही.”
वडोदरा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्याच्या भाजपच्या निर्णयावर टीका करणारे बॅनर शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. रंजनबेन भट्ट यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. वडोदरामधून तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून भट्ट यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय महिला विंगच्या उपाध्यक्षा ज्योतिबेन पंड्या यांनी पक्षाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता.
2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत रंजनबेन भट्ट विजयी झाल्या होत्या. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला होता आणि 2024 च्या आगामी निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारीही दिली होती. मात्र आज त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली आहे.