गुजरातमध्ये (Gujarat) भाजपला (BJP) दोन मोठे धक्के बसले आहेत. गुजरातमधील वडोदरा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तिकीट मिळालेल्या भाजप खासदार रंजनबेन भट्ट (Ranjanben Bhatt) यांनी शनिवारी वैयक्तिक कारणांमुळे उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली आहे. तर रंजनबेन भट्ट यांच्यासोबतच आता साबरकांठा येथील भाजपचे उमेदवार भिखाजी ठाकोर (Bhikaji Thakor) यांनीही लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत भिखाजी ठाकूर यांनी आपण निवडणूक लढवू इच्छित नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी लिहिले की, “मी भिकाजी ठाकोर, वैयक्तिक कारणांमुळे 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू इच्छित नाही.”
वडोदरा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रंजनबेन भट्ट यांनीही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर भिखाजी ठाकूर आणि रंजनबेन भट्ट यांच्या या निर्णयानांतर आता या दोन्ही जागांवर भाजपला नवे उमेदवार निवडावे लागणार आहेत.
वडोदरा लोकसभा जागेसाठी रंजनबेन भट्ट यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून भाजपमध्ये विरोध सुरू झाला आहे. रंजनबेन भट्ट यांच्या नावाला भाजप नेत्या ज्योतिबेन पंड्या यांनी विरोध केला होता. त्यांच्या नावाचा निषेध करणारे बॅनरही शहरातील विविध भागात लावण्यात आले होते. दरम्यान, आता या दोन जागांसाठी नवे उमेदवार निवडून आणावे लागणार असल्याने भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.