दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप ठेऊन ईडीने (ED) अटक केली आहे. तसेच आता अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आता केजरीवालांना अटक केल्यामुळे दिल्लीचे सरकार कोण चालवणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण आता याचं उत्तर मिळालं आहे. केजरीवाल हे तुरूंगातूनच सरकार चालवणार आहेत. त्यांनी तुरूंगातून पहिला आदेशही जारी केला आहे.
अरविंद केजरीवाल हे तुरूंगातूनच सरकार चालवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कारण अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातून जल विभागाला एक आदेश दिला आहे. याबाबतची माहिती आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी दिली आहे.
दिल्लीतील काही ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचे टँकर वाढवण्यासंदर्भात अरविंद केजरीवाल यांनी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.
आतिशी यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातून दिल्लीकरांसाठी जल मंत्रालयाशी संबंधित आदेश दिले आहेत. हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण अशा परिस्थितीत कोण असा विचार करतं? केजरीवाल तुरूंगात राहूनही दिल्लीच्या लोकांचा विचार करत आहेत. ते दिल्लीत सुरू असलेल्या कामांचा विचार करत आहेत. तसेच मी तुम्हाला केजरीवालांच्या वतीने सांगते की, त्यांचे दिल्ली सरकारच्या कामकाजावर बारीक लक्ष आहे.
अरविंद केजरीवाल हे सर्व विभागांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आणि विकासाचा आढावा घेत आहेत. आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत. तर या समस्या कशा सोडवायच्या याबाबत त्यांची सूचना दिल्या आहेत, असेही आतिशी यांनी सांगितले.