भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) राकेश कुमार सिंह भदौरिया (RKS Bhadauria) यांनी आज (24 मार्च 2024) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप त्यांना मेरठ किंवा गाझियाबादमधून उमेदवारी देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांचे आभार मानले. सप्टेंबर 2021 मध्ये सेवेतून निवृत्त होणारे राकेश सिंह भदौरिया म्हणाले, “मला भाजपमध्ये सामील होण्याची आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, भाजप प्रमुख जेपी नड्डा आणि इतर नेत्यांचे आभार मानतो.”
राफेल विमान भारताला मिळवून देण्यात राकेश सिंह भदौरिया यांची महत्त्वाची भूमिका होती. फ्रान्सकडून 36 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी भारताच्या बाजूने वाटाघाटी करणाऱ्या टीमचे नेतृत्व माजी हवाई दल प्रमुख भदौरिया करत होते. याशिवाय अनेक लष्करी सुधारणांमध्येही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांना संरक्षण सेवेतील सुमारे चार दशकांचा अनुभव आहे.
यादरम्यान भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी भदौरिया यांच्या भारतीय हवाई दलातील (IAF) प्रदीर्घ सेवेचे कौतुक केले आणि असा विश्वास व्यक्त केला की, संरक्षण दलात सक्रिय भूमिका बजावल्यानंतर ते आता राजकीय क्षेत्रातही सक्रिय योगदान देणार आहेत. तसेच भदौरिया यांनी भारतीय हवाई दलात सुमारे 40 वर्षे घालवली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमात योगदान दिले आहे, असेही तावडे म्हणाले.