पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेसाठी अनेक विकास योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे जनतेत समाधानाची भावना आहे. त्या जोडीला भारतीय जनता पक्षाने गेल्या वर्षभरापासून आगामी लोकसभा निवडणुकीचे अतिशय मायक्रो प्लॅनिंग केले आहे.त्यामुळे सहाजिकच भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे, असा विश्वास माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
परिचारक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे देशभरात करण्यात आली. विविध शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याशिवाय मंत्री, खासदार, आमदारांपासून ते बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना लोकांमध्ये जाऊन विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले.पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागात एक दिवस मुक्कामास रहायला सांगून तेथील लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. प्रत्येक कामाचे रिपोर्टींग करण्यात आले. या शिवाय सर्व्हे करण्यात आले. जनतेच्या भावना समजून घेण्यात आल्या. या सर्व कामाचा फायदा आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निश्चितच होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.