अमरावती, २४ मार्च : अमरावतीवरून मध्यप्रदेशच्या तुकईथड येथे निघालेली परतवाडा आगाराची बस ३० फूट खोल दरीत कोसळली. त्यात इंदू समाधान गंत्रे (६५, रा साठमोरी ता खकणार मध्यप्रदेश), ललिता चिमोटे (३०) बुरडघाट आणि एक बालक, अशा तिघे जण ठार झाले आहेत. तर २५ पेक्षा अधिक जखमी झाल्याची माहिती असून जखमींना नजीकच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ११:३० वाजता जवाहर कुंड येथे घाट वळणावर अचानक बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. परतवाडा आगाराची एमएच ०७ सी ९४७८ क्रमांकाची बस होती. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच राजेश सेमलकर, ओमप्रकाश तिवारी, सुनील येवले असे स्थानिक मदतीला धावले. त्यानंतर घटनास्थळी चिखलदरा पोलीस पोहोचले. आरोग्य यंत्रणेच्या वतीने तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सीमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या होळीनिमित्त अनेक आदिवासी बांधव होळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी जात असतात. त्यामुळे या परिसरातील बसेसला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.