आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लग्न पत्रिका छापल्या जातात. पण आता आपण अशा एका लग्नपत्रिकेबाबत जाणून घेणार आहोत ज्यातील मजकूर पाहून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल. तेलंगणातील (Telangana) हैदराबादमधील (Hyderabad) संगारेड्डी जिल्ह्यात एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे एका वराच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी पाहुण्यांना आमंत्रित करताना अनोखी विनंती केली आहे.
लग्न समारंभात पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची भेटवस्तू आणू नका, तर भेटवस्तूच्या बदल्यात आगामी लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी लग्न पत्रिकेत केले आहे. लग्न पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आला आहे, या फोटोखाली असे लिहिण्यात आले आहे की, नरेंद्र मोदींना मतदान करणे ही तुम्ही देऊ शकणारी सर्वोत्तम भेट असेल.
तेलंगणातील हा अनोखा विवाह 4 एप्रिल रोजी पटाचेरू येथे होणार आहे. संगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी नंदीकांती नरसिम्लू आणि त्यांची पत्नी नंदीकांती निर्मला त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाचा आनंद साजरा करत आहेत. त्यांचा मुलगा साई कुमार महिमा राणीसोबत विवाहबद्ध होणार आहे. मात्र, मुलाच्या वडिलांनी पंतप्रधान मोदींना मतदान करण्याचे आवाहन केल्याने हे लग्न चर्चेत आले आहे.
संगारेड्डी जिल्ह्यात राहणारे नंदीकांती नरसिम्लू लाकडाचा व्यवसाय करतात. त्यांनी मुलाच्या लग्नाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ अनोखे आवाहन करण्याचे ठरवले. “पंतप्रधान मोदींना मतदान करण्याचे आवाहन करणारी कल्पना माझ्या कुटुंबाला आवडली आणि त्यांनी मला पुढे जाण्यास सांगितले,” असे नरसिम्लू यांनी शनिवारी लग्नाच्या आमंत्रणांचे वितरण करताना TOI ला सांगितले.