आम आदमी पार्टीने (AAP) रविवारी (24 मार्च) झालेल्या बैठकीत ‘मैं भी केजरीवाल’ मोहीम राबवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत, हे देखील बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप ठेऊन ईडीने (ED) अटक केली आहे. तर केजरीवालांच्या अटकेनंतर ‘आप’ने आपली भविष्यातील कृती ठरवण्यासाठी बैठक घेतली होती.
केजरीवालांच्या अटकेबाबत बोलताना केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, निवडणूक रोखे घोटाळा हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे आणि केंद्रातील भाजप सरकारने यावरून लक्ष वळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केल्याच्या विरोधात आम आदमी पक्षाने रविवारी आपला निषेध सुरू ठेवला. कालकाजी मतदारसंघात आम आदमी पार्टीचे (आप) ज्येष्ठ नेते आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने सुरू झाली आहेत.