मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैनच्या (Ujjain) महाकाल (Mahakal) मंदिरात मोठा अपघात झाला आहे. महाकाल मंदिरात भस्म आरती सुरू असताना अचानक आग (Fire) लागली. या आगीत 13 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मंदिरातील सेवकांचा आणि पुजाऱ्यांचा समावेश आहे.
महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान गुलाल वापरला जातो. तर आरतीदरम्यान गर्भगृहात कापूर पेटवण्यात आला आणि गुलालही उधळण्यात आला. त्यामुळे अचानक भीषण आग लागली. या आगीत आरतीसाठी उपस्थित असलेल्यांपैकी 13 जण जखमी झाले असून त्यामध्ये पुजाऱ्यांचाही समावेश आहे.
या घटनेनंतर जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव रूग्णालयात पोहोचले. मुख्यमंत्री मोहन यादव आणि मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमधील अरबिंदो रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आणि या घटनेच्या दंडाधिकारी तपासाचे आदेश दिले आणि दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले. तसेच सीएम यादव यांनी एएनआयला सांगितले की, “मला महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये काही पुजारी जखमी झाले आहेत आणि त्यांना इंदूर आणि उज्जैन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी तिथे जात आहे. देवाचे आशीर्वाद आहेत आणि देवाचे मी आभार मानतो की ही मोठी घटना नव्हती. परंतु जे काही घडले, मी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेईन. तसेच जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.”
दरम्यान, होळीनिमित्त काल महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी गर्भगृहात पुजारी आरती करत असताना मागून अचानक कोणीतरी गुलाल उधळला आणि तो दिव्यावर पडला आणि आग लागली. गुलालामध्ये केमिकल असल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.