दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. विशेष कोर्टाने त्यांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी अटक बेकायदेशीर असल्याचे म्हणत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान आज देशभरात धुळवडीचा उत्साह कायम आहे. मात्र आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केजरीवालांच्या अटकेविरुद्ध आपला निषेध आंदोलन सुरूच ठेवले आहे.
यावर्षी होळी न खेळण्याचा तसेच होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिल्लीचे मंत्री आणि आप नेत्या अतिशी यांनी सांगितली. ”होळी हा केवळ सण नसून, वाईटावर चांगल्याचा विजयाचे हे प्रतीक आहे. क्रूरतेवर न्यायचे प्रतीक आहे. आज आम आदमी पक्षाचा प्रत्येक नेता या दुष्टाई, क्रूरता आणि अन्यायाविरुद्ध रात्रंदिवस लढा देत आहे. यंदा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा, आम्ही रंगांशी खेळणार नाही, होळी साजरी करणार नाही, असा निर्धार आदमी पक्षाने केला आहे,” असे दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी एक्स वर सांगितले.
दरम्यान केजरीवालांनी आपल्या सुटकेसाठी दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी ईडी कोठडीत पाठवण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचे सांगून उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्याची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली. कथित दिल्ली दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने आप प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. शुक्रवारी दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्यांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान आता हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.