देशात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच देशामध्ये आचारसंहिता देखील लागू झाली आहे. ७ टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. इंडी अघईड आणि एनडीएने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात देखील भाजपा आणि काँग्रेस पक्षाने आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान काँग्रेसने सोलापुरातून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने सोलापूरमध्ये माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान प्रणिती शिंदे यांनी खुले पत्र लिहीत राम सातपुते यांना डिवचले होते. मात्र आता सातपुते यांनी देखील प्रणिती शिंदे यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्वागत असल्याचे म्हटले आहे. पुढील ४० दिवस आपण भान राखून लोकशाहीचा आदर राखून आपण विचारांची लढाई विचारांनी लढूया. हे शहर सर्वधर्मसमभाव मानणारे आहे. समाजाच्या विकासासाठी लढाई लढूया. असे आपल्या पत्रात प्रणिती शिंदे यांनी लिहिले आहे.
दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या पत्राला आमदार राम सातपुते यांनी पत्र लिहीत चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आमदार . प्रणिती शिंदेजी, जय श्री राम…!
मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय. मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्षं राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. वंदे मातरम्…! आपला विनीत, राम सातपुते.
Tags: bjp vs congressloksabha election 2024mla praniti shindemla ram satputemva vs mahayutisolapur loksabha assembly