देशामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. दरम्यान ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी म्हणजेच निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान एनडीए आणि इंडी आघाडीने प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच भाजपा आणि अनेक इतर पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये अजूनही महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीये. दरम्यान बारामतीमध्ये यंदा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील बारामती हे देशातील काही हाय प्रोफाईल जागांपैकी एक आहे. यंदा सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा पवार यांचे आव्हान असणार आहे. गेल्या ५ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच बदल झाले आहेत. अनेक नाट्यमय घटना घडल्या. शिवसेना, राष्ट्रवादी सारखे पक्ष फुटले आहेत. त्या राजकीय घडामोडींचा परिणाम आता लोकसभा निवडणुकीतही दिसून येत आहे. बारामतीच्या जागेबद्दल बोलायचे झाले तर येथे सून आणि मुलगी यांच्यातच लढत आहे. मात्र शिवसेना नेते विजय शिवतारे हे देखील अपक्ष लढणार असल्याने बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार अशी शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीसांचे महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट निर्देश
काल बारामती आणि नगर दक्षिणमधील वाद संपवण्यासाठी फडणवीसांचा दोन अत्यंत महत्वाच्या बैठक पार पडल्या. हर्षवर्धन पाटील, अजित पवार, सुजय विखे, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये बैठक पार पडली. दरम्यान फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीनंतर वाद मिटल्याची बातमी समोर येत आहे. अंतर्गत वाद बाजूला ठेवून महायुतीचे काम करावे असे आदेश फडणवीसांनी महायुतीमधील नेत्यांना दिले आहेत. महायतिचा उमेदवार विजयी होईल एवढेच बघा आणि त्यासाठी बाकी सगळे बाजूला ठेवा असे स्पष्ट आदेश फडणवीसांनी बैठकीत दिल्याचे समजते. मिशन ४५ प्लस यावरच पूर्ण लक्ष केंद्रीत करावे असे फडणवीसांनी म्हटले आहे.