लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) काँग्रेसने (Congress) उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या यादीत केवळ 5 उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये राजस्थानसाठी चार आणि तामिळनाडूसाठी एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. (Congress Sixth Candidates List)
या यादीत राजस्थानच्या अजमेरमधून रामचंद्र चौधरी, राजसमंदमधून सुदर्शन रावत, भिलवाडामधून डॉ. दामोदर गुर्जर आणि कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय तमिळनाडूच्या तिरुनेलवेली लोकसभा मतदारसंघातून अधिवक्ता सी. रॉबर्ट ब्रूस यांना तिकीट देण्यात आले आहे. काल काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती. या यादीत राजस्थानच्या दोन आणि महाराष्ट्राच्या एका लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.
याआधी शनिवारी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली. यामध्ये 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. काँग्रेसने राजस्थानमधील नागौर जागा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षासाठी (RLP) सोडली होती. यापूर्वी 21 मार्च रोजी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये 57 नावांचा समावेश होता. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 तर दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.