महाराष्ट्रात महायुतीतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील तिढ्या सोडवण्यासाठी फडणवीसांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली.
तर, नगर दक्षिणमधील वाद मिटवण्यासाठी राम शिंदे, सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्यासोबत फडणवीसांची बैठक झाली. दोन्ही मतदारसंघांमधील वाद पक्षीय पातळीवर मिटले असल्याची माहिती मिळत आहेत.
बारामती मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर उशिरापर्यंत खलबतं सुरू होती. फडणवीस-हर्षवर्धन पाटलांमध्ये 2 तास चर्चा सुरू होती. वाद मिटला की नाही, हे सांगणं हर्षवर्धन पाटील यांनी टाळल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे वाद मिटला की नाही, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
मात्र अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचे काम करा, असा सल्ला बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती मिळत आहे. बारामती आणि नगर संदर्भात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यासंदर्भात आदेश दिले आहेत. महायुतीचा उमेदवार विजयी होईल एवढेच बघा, बाकी सगळं बाजूला ठेवा, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि विखे-शिंदे बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, मिशन 45 प्लस यावरच संपूर्ण लक्ष ठेवा. अंतर्गत मतभेदांवरून महायुतीच्या उमेदवारावर परिणाम होता कामा नये, अशी समज देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिली आहे.