कर्नाटकचे माजी मंत्री आणि खाण व्यापारी जी जनार्दन रेड्डी (Janardhana Reddy) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात (भाजप) पुन्हा प्रवेश केला आहे. बेकायदेशीर खाण प्रकरणातील आरोपी रेड्डी यांनी गेल्या वर्षी राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘कल्याण राज्य प्रगती पक्ष’ (KRPP) स्थापन केला होता आणि भाजपसोबतचे दोन दशकांचे नाते संपुष्टात आणले होते. तर काल रेड्डी यांनी त्यांचे KRPP भाजपमध्ये विलीन केले आणि त्यांची पत्नी अरुणा लक्ष्मी आणि काही कुटुंबीयांसह पक्षात प्रवेश केला.
दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र आणि इतरांच्या उपस्थितीत जनार्दन रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रेड्डी यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
याबाबत “घरवापसी” म्हणत जनार्दन रेड्डी म्हणाले की, केआरपीपीचा भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय “नरेंद्र मोदींचे हात बळकट करणे आणि त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास मदत करणे” हा आहे. “अमित शाह यांनी मला दिल्लीत बोलावले होते आणि मला सांगितले होते की बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, लोकसभा निवडणुकीत KRPP भाजपला पाठिंबा देत आहे आणि मी भाजपमध्ये जावे आणि त्यासाठी काम केले पाहिजे. या पक्षात राजकीय जन्म झाला आहे, हे मान्य करून मी पक्षात प्रवेश करत आहे,’ असे रेड्डी म्हणाले.
“विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली इतर नेत्यांसोबत मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. मी कोणत्याही अटी किंवा अपेक्षा घेऊन आलो नाही. पक्ष मला कोणतीही जबाबदारी देईल, मी प्रामाणिकपणे काम करेन. भाजप नेहमीच माझ्या रक्तात होती, पण काही कारणांमुळे मी बाहेर पडलो, पण आज मी माझ्या आईच्या कुशीत परतलोय असं वाटतंय. माझ्या भावांना इथे पाहून असे वाटत नाही की मी 13 वर्षांनी भाजपच्या कार्यालयात परत येत आहे”, असेही जनार्दन रेड्डी म्हणाले.