दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरच तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांची कन्या के. कविता यांना देखील अटक केली होती. के. कविता या घोटाळ्यामध्ये आरोपी आहेत. दरम्यान न्यायालयाने के.कविता यांना ९ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. कवितांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी ईडीने न्यायालयाकडे वेळ मागितला, तर कविताच्या वकिलाने सांगितले की जोपर्यंत ईडीला नियमित जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ हवा आहे, तोपर्यंत कविताला अंतरिम जामीन मंजूर करावा. के कविता यांनी आपल्या मुलाच्या बोर्ड परीक्षेचे कारण देत अंतरिम जामीनही मागितला होता. राऊस ॲव्हेन्यू कोर्ट आता के कविता यांच्या अंतरिम जामिनावर १ एप्रिल रोजी सुनावणी घेणार आहे.
राऊस ॲव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान के. कविता यांच्या वकिलाने सांगितले की, ईडीकडून सुरू असलेल्या तपासाचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवावे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. पीएमएलए कोर्टाने केजरीवालांना २७ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे. यापूर्वी ९ वेळा समन्स बजावून देखील केजरीवाल उपस्थित न राहिल्याने ईडीने हायकोर्टात धाव घेतली होती.
अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेविरोधात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दर आम आदमी पक्षाने यंदा होळी साजरी न करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. तसेच आम आदमी पक्ष देशभरात केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन करत आहे. ईडीने आरोप केला आहे की, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता ही ‘दक्षिण ग्रुप’ चा भाग होती, ज्याने 2021-22 च्या अबकारी धोरणांतर्गत मद्य व्यवसाय परवान्याच्या बदल्यात दिल्लीच्या सत्ताधारी आम आदमी पार्टीला (AAP) 100 कोटी रुपयांची लाच दिली. हे धोरण आता रद्द करण्यात आले आहे.