अभिनेत्री कंगना राणावतवरील अश्लिल टीकेप्रकरणी काँग्रेस विरोधातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलेल्या घाणेरड्या टीकेची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोग सुप्रिया श्रीनेतच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.
श्रीनेत यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कंगना संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. ही पोस्ट नंतर हटविण्यातही आली. यावर आपल्या अकांउटचा ऍक्सेस दुसऱ्याकडे गेला होता, यामुळे ही गडबड झाल्याची सारवासारव सुप्रिया श्रीनेत यांनी केली होती. तसेच आपण ही पोस्ट केली नसल्याचा दावा श्रीनेत यांनी केला आहे.
याप्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या की, यासंदर्भात आपण निवडणूक आयागोशी संपर्क साधणार आहोत. भाजपचे सदस्य तजिंदर बग्गा यांनी हा मुद्दा उचलला. याबाबत ट्विटरवर प्रतिक्रिया देतांना बग्गा म्हणाले की, कंगना राणावत आपण एक योद्धा आणि चमकणारा तारा आहात. ज्या लोकांना असुरक्षित वाटते ते लोक घाणेरडा प्रकार करतात. अशीच चमकत रहा. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. यातून काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा समोर आला आहे. राहुल गांधींच्या निकटवर्तीय सुप्रिया यांनी काँग्रेसचा नेहरूवादी चेहरा दाखवल्याची टीका बग्गा यांनी केली आहे.
भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, श्रीनेत यांचे हे घृणास्पद आहे. कंगना राणावतवर केलेली टिप्पणी अत्यंत लाजिरवाणी आहे. प्रियंका गांधी या संदर्भात काही बोलणार आहेत का ? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुप्रिया श्रीनेत यांना हटविणार का ? असे सवालही पुनावाला यांनी केले आहेत.
यापार्श्वभूमीवर कंगना राणावत आज, मंगळवारी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. या घटनाक्रमावर बोलताना कंगना म्हणाल्या की, प्रत्येकानेच महिलांचा सन्मान राखण्याची गरज आहे. प्रत्येक महिला आदरास पात्र असते. यासंदर्भात पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी भेटीला बोलावले आहे. त्यांची भेट झाल्यानंतर यासंदर्भात बोलेन तोपर्यंत याविषयी अधिक भाष्य करणार नसल्याचे कंगनाने म्हंटले आहे.कंगना राणावत हिला भाजप पक्षाकडून लोकसभेसाठी हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.