आज आयपीएलच्या स्पर्धेत पाच वेळा स्पर्धा जिंकलेले मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचा तर पॅट कमिन्स हैद्राबाद संघाचा कर्णधार आहे. दोन्ही संघ आपले पहिले सामने पराभूत होऊन आले आहेत. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सच्या सामन्यात हार पत्करावी लागली. तर हैद्राबाद संघाला कोलकाता संघाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. सूर्यकुमार यादव अजूनही फिट नसल्याने तो अजून एका सामन्याला मुकणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैद्राबाद येथे हा सामना होणार आहे.
मुंबईच्या संघाला पहिल्या सामन्यात ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. माजी कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईची फलंदाजी गडगडली होती. हार्दिक पंड्या देखील शेवटच्या ओव्हरमध्ये फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे हैद्राबादमध्ये मुंबईला फलंदाजी चांगली करावी लागणार आहे. हार्दिक,ईशान किशन , रोहितला चांगल्या धावा कराव्या लागणार आहेत. तर जसप्रीत बुमराह, पियुष चावला आणि अन्य गोलंदाजांवर मुंबईची मदार असणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. २०८ धावांचे आव्हान पार करताना हैदराबाद संघाला २०२४ धावांचा पाठलाग करता आला. हेन्रिक क्लासेनने वादळी फलंदाजी केली होती. मात्र शेवटच्या काही ओव्हर्समध्ये त्यांना धावसंख्या पार करता आलेली नाही.