लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. तसेच आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांनी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले.
उमेदवारी अर्ज भरण्याआधी केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे लोकसभा उमेदवार नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ”या ठिकाणी अजूनही लोक येत आहे. राजू पारवे आणि मी आम्ही आज जो फॉर्म भरणार आहे, ते आमच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात, त्या सर्व जनतेला मी मनापासून अभिवादन करतो. गेल्या १० वर्षांपासून मला नागपूर लोकसभेची सेवा करण्याची संधी मिळाली. १ लाख कोटींपेक्षा जास्त रकमेची विकासकामे या भागात झाली. याचे श्रेय मला किंवा देवेंद्रजींना नाही तर माझ्यासमोर हजर असलेल्या हजारो कार्यकर्त्यांना आहे. या निवडणुकीत मी तर विजयी होणारच आहे. माझी विनंती आहे की, यावेळी ७५ टक्के मतदान झाले पाहिजे. पाच लाखांपेक्षा जास्त मतांनी आपण मला या मतदारसंघातून विजयी करावे अशी माझी आपल्या सर्वाना विनंती आहे.”
दरम्यान भाजपाने आपले २३ उमेदवारी जाहीर केले असून उद्या पर्यंत महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. काल चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरेंना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तसेच शिरूर मध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होण्याची शक्यता आहे. कारण काल आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.