‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याला पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी फोर्ट परिसरातील हुक्का बारवर छापा टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी मुनव्वर फारूकीसह इतर 13 जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर चौकशी केल्यानंतर मुनव्वरला सोडून देण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
काल रात्री दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला होता. हर्बलच्या नावाखाली तंबाखूयुक्त हुक्का ओढत असल्याच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी मुनव्वर फारूकीसह 13 जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले.
याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्या टीमला हर्बलच्या बदल्यात तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर हुक्का बारवर छापा टाकण्यात आला. आम्ही वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी तज्ञांना बोलावले होते.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वांना सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान, मुनव्वर फारुकीला हुक्का पार्लर मधून अटक झाल्यानंतर “रिॲलिटी शो मधील कलाकार” आणि “नशेखोरी” हे समीकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे.
अलीकडेच मुनव्वर फारुकीने बिग बॉस सीझन 17 जिंकला आहे. हा शो जिंकल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच तो बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीसाठी पोहोचला होता. या पार्टीतले त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.