(१६०८ देहू ते १६५०- देहू )
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय”!
जगद्गुरू तुकाराम महाराज की जय !
या जयघोषावरुन लक्षात आलंच असेल की, तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणून मानले जायचे आणि आताही मानले जाते. विचारवंत कवी असल्या बरोबरच ते समाज सुधारक सुद्धा होतेच. म्हणूनच त्यांच्या कार्याने ‘तुका झालासे कळस’ भागवत धर्माचा ते कळस झाले. त्यांचे आराध्य दैवत म्हणजे विठोबा आणि त्यांचे गुरु- बाबाजी चैतन्य.
इतिहासात आपण वाचलं आहेच की, संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना क्षात्रधर्म म्हणजे काय ते सांगितले होते, राजधर्म समजविला होता, त्यांची भेट झाल्याचे दाखले इतिहासात आहेत. तुकाराम महाराज यांचा वंश परंपरागत व्यवसाय वाण्याचा आणि सावकारीचा होता. या सुखवस्तू आणि प्रतिष्ठित घरात विठ्ठलभक्ति पूर्वापार होती. त्यांच्या घराण्यातले प्रथम पुरुष विश्वंभर यांनी त्यांच्या नदीकाठच्या घरात विठ्ठल-रखूमाईचे देऊळ बांधले होते. या घराला देऊळवाडाच म्हणत. त्यामुळे घरातील या मंदिरातच भजन, कीर्तन, पुराणे ऐकत तुकोबा बहुश्रुत झाले होते. त्यांच्या आत्मचरित्रपर अभंगातून त्यांच्या वेळच्या सर्व परिस्थितीची आपल्याला कल्पना येते. त्यांचे लहान वयातच लग्न झाले. दुष्काळ, प्रापंचिक अडचणी व संकटे यांना सतत सामोरे जावे लागले, सावकारीचा पारंपरिक व्यवसाय बंद झाला. पण विठ्ठल भक्तीत खंड नव्हता. पण त्यानंतर मात्र यातून मुक्त होत, प्रवचन कीर्तन करत त्यांचा भक्तिमार्ग जास्तच बळकट झाला. देहु गावाजवळ भंडारा डोंगरावर शांत वातावरणात त्यांची उपासना चालू झाली. शाश्वताचा शोध चालू असताना त्यांना परब्रम्ह ‘विठ्ठल’ भेटला असे मानले जाते.
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले |
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा |
जे आयुष्यात त्रासलेले पिडलेले आहेत, त्यांना जो आपले म्हणतो म्हणजे समजून घेतो, त्याला मदत करतो, तोच सज्जन असतो म्हणजेच त्याच्याच ठिकाणी देव असतो इतका साधा सरळ आणि सोपा भक्तीचा मार्ग त्यांनी अभंगातून सर्व सामान्य लोकांना सांगितला.
संत तुकाराम महाराजांनी चुकीच्या गोष्टींवर आणि दांभिकपणावर अभंगातून रोखठोकपणे प्रबोधन केले आहे. जे आजही लोकांना उपयोगी पडेल, पटेल. प्रतिकूल सामाजिक परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागले होते. पण तरीही त्यांनी समता आणि मानवता हीच शिकवण समाजाला दिली आणि संदेश दिला की,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम अमंगळ ||
त्यांच्या कुठल्याही अभंगात त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने परिस्थिति समजावून सांगितली आहे. त्या भाषेत कुठलेही अलंकार वापरले नाहीत, फुलोरा नाही ,अशी अनेक उदाहरणे आहेत.
‘नाही निर्मळ मन, काय करील साबण |
आपल्याला या शब्दांचा अर्थ लगेच, त्या क्षणीच समजतो.साबण अत्तरे, सेंट, आजचे बाजारात उपलब्ध असलेले बॉडी स्प्रे, डिओडरंट कितीही अंगावर फुंकरले तरी मन निर्मल किंवा शुद्ध नसेल तर, मनात वाईट विचार असेल तर, त्या फवार्यांिचा उपयोग काय? आजच्या छानछौकीच्या जगात किती किती खरं आहे हे . आजच्या जाहिरात युगात बेधुंद वावरणाऱ्या लोकांनी तुकोबांनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार जरूर करावा .
किंवा
वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं वनचरें |
पक्षी ही सुस्वरे आळविती ||
तुकोबांनी या रचनेतून पर्यावरणा संबंधी वर्णन केले आहे. शेकडो वर्षापूर्वीचे हे वर्णन निसर्गातील सान्निध्यामुळे कसा प्रसन्न व सुखकारक असा एकांत मिळतो.
निसर्गातील प्राणी, पक्षी, लता, वेली, झाडे, वारा, पाणी याबरोबर आपण एकरूप झाल्यावर ते आपल्याशी संवाद साधतात. त्यांच्यात व आपल्यात एक नात्यांचा बंध तयार होतो.
आज पर्यावरण हा विषय आता शाळेपासून मुलांना आणि माणसांना सुद्धा शिकवण्याची वेळ आली आहे. मनुष्याने भौतिक प्रगतिच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास केला आहे, त्या काळात हे काहीही नव्हतं तेंव्हाचं हे सुखद वर्णन नक्कीच माणसाला धडा घेण्यासारखे आहे.
संत तुकाराम महाराज यांचे गाथेतले अभंग जवळ जवळ पाच हजारांवर आहेत. अध्यात्माचा अभ्यास, मनन चिंतन आणि गीता,भागवत. ज्ञानेश्वरी, संतांच्या गाथा, रामायण या सर्वांचा त्यांचा व्यासंग होता. यातूनच ते काव्यातून आपले विचार मांडू लागले, लोक जागृती करू लागल्याचे दिसते. असे म्हणतात की पांडुरंगाने नामदेवांसहित स्वप्नात येऊन, ‘नामदेवांची शतकोटी अभंगाची संख्या अपुरी राहिली आहे, ती तू पूर्ण कर’ असा तुकोबांना दृष्टान्त दिला आहे. आणि तुकोबा अभंग लिहू लागले.
.
हे सर्व अभंग म्हणजे त्यांनी घेतलेल्या अनुभवांची शिदोरी आहे. शुद्ध परमार्थ धर्म कसा असला पाहिजे त्याचे मार्गदर्शन आहे. समाजातल्या विसंगतीवर, अपधर्मावर,कर्मकांडावर आणि दिसत असलेल्या थोतांडावर त्यांनी चांगले कोरडे ओढले आहे.
याशिवाय त्यांच्या अभंगातून मनुष्य जीवनातील भावनिक कल्लोळ, मानसिक ताणतणाव व होणारी उलघाल .संघर्ष, आपली मूल्ये या सगळ्यांचे दर्शन होते. म्हणून सामान्य लोकांना हे अभंग किंवा या कविता आपल्या वाटतात.
मराठी साहित्यात संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचे महत्वाचे स्थान आहे. त्यातले संदर्भ वैश्विक आहेत असे अनेक अभंगावरून लक्षात येते. अनेक लेखकांनी आणि साहित्यिकांनी तर विल्यम शेक्सपियर आणि तुकोबांची तुलना केली आहे, साम्य दाखविले आहे.
ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांनीही असेच मत त्यांच्या कवितेत व्यक्त केले आहे. विंदांनी तर दोघांची भेटच घडवली आहे. बघुया या वर्णनाच्या काही ओळी. –
तुकोबाच्या भेटी| शेक्स्पीअर आला |
तो झाला सोहळा| दुकानात ||
जाहली दोघांची| उराउरी भेट |
उरातले थेट| उरामध्ये ||
तुका म्हणे “विल्या,| तुझे कर्म थोर |
अवघाची संसार| उभा केला” ||
शेक्स्पीअर म्हणे, | “एक ते राहिले |
तुवा जे पाहिले | विटेवरी”||
तुका म्हणे, “बाबा| ते त्वा बरे केले |
त्याने तडे गेले| संसाराला ||
विंदा करंदीकर
असे संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून समजून घ्यायला हवेत .
विठ्ठल विठ्ठल …!
डॉ. नयना कासखेडीकर
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे