आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेस (Congress) नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) संतापले आहेत.
“शिवसेनेने टोकाची भूमिका घेऊ नये, यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होईल. मला काँग्रेस नेतृत्वाचे लक्ष वेधून घ्यायचे आहे की त्यांनी हस्तक्षेप करावा, नाही तर पक्ष वाचवण्यासाठी युती तोडावी. शिवसेनेसोबत युतीचा निर्णय काँग्रेससाठी आत्मघातकी ठरेल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात आणि त्यापलीकडेही जाणवेल”, असे संजय निरुपम यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बाळासाहेब थोरात यांच्या आक्षेपाचाही सेनेने विचार केला नसल्याचे संजय निरुपम म्हणाले. “शिवसेनेसोबतच्या चर्चेचे नेतृत्व करण्यासाठी नेमलेल्या सदस्यांपैकी बाळासाहेब थोरात हे एक होते. फेरविचार व्हायला हवा असे ते म्हणत असतील, तर त्याचा अर्थ त्यांच्या म्हणण्यावरही विचार केला गेला नाही. जर सेनेने वाटाघाटी करणाऱ्या टीमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, याचा अर्थ आपण सर्व गमावले आहे,” असे निरुपम म्हणाले.
आपल्या पुढील वाटचालीबद्दल बोलताना निरपुम म्हणाले, “आता माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. मी एक आठवडा वाट पाहीन आणि माझा निर्णय घेईन.”
तसेच लोकसभेत 2009 मध्ये उत्तर मुंबईचे प्रतिनिधीत्व केलेले निरुपम म्हणाले की, मुंबईत उमेदवार उभे करण्याचा शिवसेनेचा निर्णय म्हणजे काँग्रेसला बाजूला सारणे आहे. “मुंबईत काँग्रेसला साईड लाईन करण्यासाठी हे आहे. मुंबईतील काँग्रेसचे मतदार शिवसेनेला कसे मत देतील?” असा सवालही निरुपम यांनी केला.