काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई करत त्यांना अटक केली आहे. तसंच कोर्टाने केजरीवालांना ईडी कोठडी (ED Custody) सुनावली आहे. त्यामुळे आता ते तुरूंगातूनच सरकारचं कामकाज बघत आहेत. अशातच आता केजरीवालांची प्रकृती अचानक बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी कोठडीत असलेल्या केजरीवालांची शुगर लेव्हल अचानक लो झाली आहे. त्यांची शुगर लेव्हल 46 पर्यंत घसरली आहे. तसंच मागच्या काही तासांपासून त्यांची शुगर लेव्हल खाली-वर येत आहे. त्यामुळे हे प्रकृतीस धोकादायक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी बुधवारी एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत त्यांनी म्हटले होते की, “मंगळवारी संध्याकाळी मी तुरुंगात आपल्या पतीला भेटायला गेले होते. त्यांना मधुमेह आहे आणि त्यांची शुगर लेव्हल ठीक नाहीये, तरीही ते खुप निश्चयी आहेत. ते खरे देशभक्त, निर्भय आणि धाडसी व्यक्ती आहेत. तसेच त्यांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करा. त्यांनी सांगितले आहे की, माझे शरीर तुरुंगात आहे पण माझा आत्मा तुम्हा सर्वांमध्ये आहे. तुम्ही डोळे बंद कराल तेव्हा तुम्हाला मी तुमच्या अवतीभवती जाणवेल”, असे सुनीता यांनी सांगितले.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने ताब्यात घेतले होते. अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.