Ramakrishna Mission president Swami Samranand passed away
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी स्मरणानंद २०१७ मध्ये रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष बनले होते.
आर.के. मिशनच्या वतीने अधिकृतपणे त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. यात महाराजांनी मंगळवारी रात्री ८.१४ वाजता महासमाधी घेतल्याचे मठाकडून सांगण्यात आले आहे. २९ जानेवारी रोजी युरिनमध्ये इन्फेक्शन झाल्याच्या कारणास्तव त्यांना रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठानमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने ३ मार्च रोजी व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर स्वामींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांचे अनुयानी आणि भाविकांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.
कोण होते स्वामी स्मरणानंद :
स्वामी स्मरणानंद हे रामकृष्ण मठ आणि मिशनचे १६ वे प्राचार्य होते. स्वामी आत्मस्थानंद यांच्या निधनानंतर १७ जुलै २०१७ रोजी त्यांनी प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला. स्वामी स्मरणानंद यांचा जन्म १९२९ मध्ये तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील अंदामी गावात झाला. अगदी लहान वयात त्यांच्या आईचे निधन झाले होते. १९४६ मध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून नाशिकमधून वाणिज्य पदविका केली. १९४९ मध्ये मुंबईत आले. रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन ते मुंबई रामकृष्ण मिशनमध्ये सामील झाले. १९५२ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी स्वामींनी शंकरानंद यांच्याकडून दीक्षा घेतली. स्वामी स्मरणानंद यांनी १९५६ मध्ये ब्रह्मचर्य धारण केले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी स्वामींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन स्वामीजींच्या निधनावर शोक व्यक्त केला. रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मशिनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंदजी महाराज यांनी आपले जीवन अध्यात्म आणि सेवा कार्यासाठी समर्पित केले. महाराजांनी असंख्य मनांवर व बुद्धीवादींवर आपला प्रभाव निर्माण केला आहे. त्यांची करुणा आणि बुद्धीमता पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणा असेल, असे म्हणत मोदींनी स्वामीजींच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण केली.
तसेच, स्वामीजींसोबत गेल्या अनेक वर्षांपासून माझे ऋणानुबंध होते. २०२० सालची माझी बेलुर मठातील यात्रा मला आज आठवते, जेव्हा मी त्यांच्यासोबत संवाद साधला होता. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे जाऊनही मी त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले होते. बेलुर मठातील असंख्य अनुयायी व भाविकांसोबत माझ्या सहवेदना आहेत, असेही मोदींनी म्हटले आहे.