ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev) यांच्यावर काही दिवसांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया (Brain Surgery) झाली. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने आणि सूज आल्याने सद्गुरू यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मेंदूतील गोठलेले रक्त काढण्यासाठी 17 मार्च रोजी सद्गुरू यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
आता सद्गुरू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते आता बरे होत आहेत. तसेच प्रकृतीतील सुधारणा पाहून सद्गुरु जग्गी वासुदेव यांना नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.
तत्पूर्वी, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना त्यांचे हेल्थ अपडेट शेअर केले होते. त्यांनी इंस्टाग्रामवर हॉस्पिटलच्या खोलीतून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत सद्गुरूंनी लिहिले होते की, लवकरच बरे होण्याच्या मार्गावर. या व्हिडिओमध्ये सद्गुरू हॉस्पिटलच्या बेडवर बसून वर्तमानपत्र वाचताना दिसत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सद्गुरूंशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आणि सद्गुरूंनी पंतप्रधानांचे आभार मानले होते.
हॉस्पिटलने जारी केलेल्या निवेदनात, न्यूरोलॉजिस्टने म्हटले होते की, वेदना तीव्र असूनही सद्गुरुंनी त्यांचे सामान्य दैनंदिन वेळापत्रक चालू ठेवले होते. 8 मार्च रोजी महाशिवरात्रीचे आयोजनही केले होते त्यातही ते सामील झाले होते. मात्र, 15 मार्च रोजी त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांच्या टीमला सबड्युरल हेमॅटोमाचा संशय आला आणि त्यांनी ताबडतोब एमआरआय करण्याचा सल्ला दिला. तपासणीत मेंदूला सूज येऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले. त्यानंतर सद्गुरूंची शस्त्रक्रिया करण्यात आली.