गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट (Former IPS Officer Sanjiv Bhatt) यांना 28 वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. 1996 मध्ये माजी आयपीएस संजीव भट्ट यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज (27 मार्च) त्यांना याच प्रकरणी पालनपूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे.
1996 च्या या प्रकरणात बनासकांठाचे तत्कालीन एसपी संजीव भट्ट यांच्यावर पालनपूरमधील हॉटेलमध्ये दीड किलो अफू ठेवून एका वकिलाला अंमली पदार्थाच्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर या प्रकरणी आज त्यांना कोर्टानं दोषी ठरवलं आहे.
याशिवाय, संजीव भट्ट यांच्यासह तिस्ता सेटलवाड आणि गुजरातचे माजी डीजीपी आरबी श्रीकुमार यांच्यावर 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी पुरावे तयार केल्याचा आरोप आहे. या तिघांनी खोटी शपथपत्रे तयार करून तत्कालीन गुजरातमधील मोदी सरकारला बदनाम करण्याचं कटकारस्थान रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर 2011 मध्ये संजीव भट्ट यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.