अमरावतीच्या (Amaravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राष्ट्रीय स्वाभिमानी पार्टीचा राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. तसेच भाजपने (BJP) नवनीत राणा यांना अमरावती मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
नवनीत राणा यांनी आपला राजीनामा युवा स्वाभिमानी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांच्याकडे सादर केला आहे. या राजीनामा पत्रात नवनीत राणा यांनी म्हटले आहे की, मी सौ नवनीत राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आज दिनांक 27 मार्च 2024 रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.
पार्टीने आजपर्यंत मला जो मानसन्मान दिला, सहकार्य केले त्याबद्दल मी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे आभार मानते. कृपया माझा राजीनामा स्वीकारून मला सर्व जाबाबदारीतून मोकळे करावे ही विनंती, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांनी काल रात्री उशीरा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मुर्ती आणि पक्षाचा दुपट्टा घालून त्याचे पक्षामध्ये स्वागत केले. तर आता नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.