समाजामुळेच राजा हा राजा होतो, समाजाने त्याला ज्याकरिता कारभार सोपवला, ते त्याने केले नाही, तर त्याला समाज पायउतार करतो. जसा समाज असेल, तसा राजा असतो, देश मोठा व्हायचा असेल, तर समाज मोठा झाला पाहिजे, ज्या देशाचा सामान्य माणूस मोठा, तो देश मोठा, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
लोकमान्य सेवा संघाच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित “सामाजिक परिवर्तन – संस्थांची भूमिका” विषयावरील व्याख्यानात ते बुधवारी बोलत होते. शाळा-कॉलेज, घर आणि समाजामध्ये निरनिराळे कार्यक्रम करणाऱ्या संस्था या तीन ठिकाणांहून माणसाला शिक्षण मिळते. त्यामुळे, समाज परिवर्तनात संस्थांची भूमिका फार मोठी आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
लोकमान्य सेवा संघ आणि रा. स्व. संघ या दोन्ही संस्था बऱ्याच बाबतींत समानधर्मी आहेत, डॉ. हेडगेवार हे नागपुरात ‘टिळक गटाचे’ म्हणून ओळखले जात, असे सांगत त्यांनी दोन्ही संस्थांमधील समानतेवर भाष्य केले. आज आपण सर्व गोष्टी आउटसोर्स करतो, ठेका काढतो, जी कामं आपण करायला हवी तीची अपेक्षा ठेका दिलेल्या लोकांकडून करतो. घरासमोर कचरा उचलायला लोक ठेवतो, जे आपलं काम आहे त्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. तसं देशाचं काम करायला पण नेत्यांना ठेका देतो आणि अपेक्षा करतो की, त्यांनी सर्व कामे केली पाहिजेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आज कुटुंबांच्या संबंधांचे बांध ढिले व्हायला सुरुवात झाली आहे, आपल्याकडे टोकाचा जडवाद आणि भोगवाद हेतुपुरस्सर रुजवला गेला, त्यामुळे सुशिक्षित वर्गामध्ये कुटुंबसंबंधांतील विस्कळीतता जास्त दिसते; त्या प्रमाणात अशिक्षित वर्गामध्ये ती दिसून येत नाही. समाजातील आपलेपणा वाढला पाहिजे, समाज, देश,राष्ट्रासाठी मी किती वेळ खर्च करतो, याचा विचार व्हायला हवा, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
सर्व कुटुंबाने एकत्र बसून आठवड्यातून एक दिवस गप्पा मारणे, आपला वंश, परंपरागत रीती, इ. वर चर्चा व्हावी व नवीन पिढीच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन समाधान व्हावे, पाणी वाचवणे, प्लास्टिक हटवणे., वृक्षारोपण, प्रत्येक जण घरात एवढं करूच शकतो, समरसता,नागरी शिष्टाचार अतिशय आवश्यक आहेत. स्वदेशी म्हणजे फक्त विदेशी वस्तू वापरू नये असे नाही, विनोबा भावे म्हणतात स्वदेशी म्हणजे स्वावलंबन आणि अहिंसा. आम्ही त्यात आणखी एक भर घालतो ते म्हणजे साधेपणा, असे डॉ. भागवत म्हणाले.