लोकसभा निवडणूक लवकर होणार आहे. ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपाने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच आतापर्यंत लोकसभा उमेदवारांच्या ७ याद्या जाहीर केल्या आहेत. काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट यावेळेस कापण्यात आले आहे. दरम्यान विद्यमान खासदार वरुण गांधी यांचे तिकीट देखील भाजपने कापले आहे. त्यानंतर पीलीभीत मतदारसंघचे खासदार वरून गांधी यांनी तेथील जनतेला पत्र भावनिक पत्र लिहिले आहे.
वरुण गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ”हे पत्र लिहिताना असंख्य आठवणींनी मला भावूक केले आहे. मला आठवतंय तो ३ वर्षाचा मुलगा जो १९८३ मध्ये पहिल्यांदा आईचं बोट धरून पिलीभीतला आला होता. मग त्याला माहित नव्हते की एक दिवस ही जमीन त्याची कर्मभूमी होईल आणि येथील जनता त्याचे कुटुंब होईल. पिलीभीतच्या लोकांची वर्षानुवर्षे सेवा करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. केवळ खासदार म्हणूनच नाही तर एक व्यक्ती म्हणूनही पिलीभीतमधून मिळालेले आदर्श, साधेपणा आणि दयाळूपणाचा माझ्या संगोपनात आणि विकासात मोठा वाटा आहे. तुमचा प्रतिनिधी असणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. तसेच मी नेहमी तुमच्या हितासाठी माझ्या क्षमतेनुसार बोललो आहे.
माझा खासदारकीचा कार्यकाळ संपत असला तरी पिलीभीतशी माझे नाते शेवटच्या श्वासापर्यंत संपू शकत नाही. खासदार म्हणून नाही तर मुलगा म्हणून आयुष्यभर तुमची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि तुमच्यासाठी माझे दरवाजे पूर्वीप्रमाणेच सदैव खुले राहतील. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी राजकारणात आलो आणि आज मी तुमचा आशीर्वाद घेतो की, कितीही किंमत मोजावी लागली तरी हे काम मी नेहमीच करत राहीन. माझे आणि पीलीभीतमधील नाते हे प्रेम आणि विश्वासाचे आहे, जे कोणत्याही राजकीय गुणवत्तेपेक्षा खूप वरचे आहे. मी तुमचाच होतो, आहे आणि तुमचाच राहणार.