राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा मोठा अपघात झाला आहे. घरात पाय घसरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या खुब्याला मार लागला आहे.
दिलीप वळसे पाटील रात्री अंधारात लाईट सुरू करायला जात असताना पाय घसरून पडले. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. पाय घसरून पडल्यानंतर त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुण्यातील औंध येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रूग्णालयात 12 ते 15 दिवस उपचार सुरू राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या अपघाताबाबतची माहिती स्वत: ट्विट करत दिली आहे. “काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईलठ, अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर वळसे पाटील यांना दुखापत झाल्याने पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सध्या त्यांच्या समर्थकांकडून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे.
दिलीप वळसे पाटलांवर शिरूर लोकसभा मतदार संघाची मोठी जबाबदारी आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे विरूद्ध अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील अशी थेट लढत होत आहे. तर या लढतीत शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचाराची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्यावर अजित पवारांनी सोपवली आहे. मात्र, आता वळसे पाटील यांना दुखापत झाल्याने पक्षाच्या चिंतेत वाढ झाली आहे.