तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विकासासाठी विविध आश्वासने दिली होती. राज्यात समाजाची लोकसंख्या ८० लाखापेक्षाही जास्त आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात वडार समाजाचे निर्णायक मते आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने’ मी वडार महाराष्ट्राचा ‘या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी पत्रकार परिषदेव्दारे दिला आहे.
दरम्यान, सोलापूर येथे २०१८ मध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. फडणवीस यांनी वडार समाजाला एस.टी प्रवर्गात समावेश करु, समाजाच्या वस्तीची जागा त्यांच्या मालकीची करु, समाजातील तरुणांना रोजगार देऊ, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र आश्रमशाळा व वसतिगृह सुरु करु, मजूर सोसायट्यांना दहा टक्के कामे आरक्षित ठेऊ, तरुणांनी उद्योग व्यवसाय करावा म्हणून पैलवान मारुती चव्हाण – वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू यासह आदी विविध घोषणा व आश्वासने देण्यात आली होती.
सत्ताधाऱ्यानी वेळोवेळी आश्वासने देऊन वडार समाजाचा केवळ मतासाठीच वापर केला आहे. सत्तेवर आल्यानंतर मात्र आश्वासनाची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे अशा संधीसाधू राजकारण्यांच्या विरोधात हा एल्गार वडार समाजाने पुकारला असून कोणत्याही परिस्थितीत बहिष्कारापासून मागे हटणार नाही, असेही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. .