मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने पक्षप्रवेश केला.आहे. गोविंदा शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.
वर्षा बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज शिवजयंतीच्या अत्यंत पवित्र दिनी आपले सगळ्यांचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी हे शिवसेनेत आले आहेत. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे गोविंदा शिवसेनेत आले आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. असे एकनाथ शिंदें म्हणाले आहेत.
तसेच गोविंदा यानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ,“नमस्कार, जय महाराष्ट्र! मी आज एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो. मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी राजकारणातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की मी पुन्हा राजकारणात येईल. पण 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर मी जिथे आहे त्याच पक्षात एकनाथ शिंदे यांच्या कृपाने पुन्हा या पक्षात आलोय. मी सर्वांचे आभार मानतो. मी राजकारणापासून लांब जात होतो. मी धन्यवाद देतो. पण आपल्याकडून मला मिळालेली ही जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडेन. मी सेवा प्रदान करेन. मी कला आणि संस्कृतीसाठी काम करेन. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे”. असे गोविंदा म्हणाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज अनेक दिग्गजांचे प्रवेश शिवसेनेत होणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे. अभिनेता गोविंदा याच्यासह अभिनेत्री करीना कपूर, करीश्मा कपूर ह्याही हाती भगवा झेंडा घेणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच मुंबई काँग्रेसचा एक बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही सांगितले जात आहे.