उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचे (Mukhtar Ansari) निधन झाले आहे. मुख्तार अन्सारी बांदा कारागृहात बंद होता. तेथे प्रकृती खालावल्यानंतर मुख्तारला उपचारासाठी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Mukhtar Ansari Death)
प्राथमिक माहितीनुसार, मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. मुख्तारच्या मृत्यूनंतर पोलिसांनी बांदासह यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला आहे. बांदासोबतच राज्यातील अनेक कारागृहांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
बांदा तुरुंगात बंद असलेले पूर्वांचल माफिया आणि माजी आमदार मुख्तार अन्सारीची प्रकृती गुरुवारी सायंकाळी बिघडल्याची होती. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने अंसारीला कडेकोट बंदोबस्तात राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
याआधी मंगळवारी अन्सारीला शासकीय राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर सायंकाळी उशिरा त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. अन्सारीची मंगळवारी सायंकाळी उशिरा पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली. 26 मार्च रोजी, मुख्तारचा भाऊ आणि गाझीपूर बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनी पीटीआयला सांगितले होते की, आज पहाटे त्यांना मोहम्मदाबाद पोलीस ठाण्यातून एक संदेश आला की, मुख्तारची तब्येत बिघडली आहे आणि त्याला बांदा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे.
यापूर्वी जेव्हा मुख्तारची प्रकृती खालावली होती, तेव्हा त्याचा भाऊ अफजल अन्सारी यांनी दावा केला होता की, मुख्तारला तुरुंगात स्लो पॉयझन दिले जात होते. अफजलने सांगितले की, तुरुंगात झालेल्या भेटीदरम्यान मुख्तारने त्याला सांगितले होते की, त्याच्या जेवणात काही विषारी पदार्थ टाकण्यात आले होते आणि असे घडण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याने सांगितले की, मुख्तारने त्याला सांगितले की, त्याला सुमारे 40 दिवसांपूर्वी विष देण्यात आले होते आणि अलीकडेच ते पुन्हा देण्यात आले, बहुधा 19 किंवा 22 मार्च रोजी, त्यानंतर त्याची प्रकृती खराब झाली.
अनेकवेळा मढचे आमदार राहिलेले मुख्तार अन्सारी हा विविध खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असून तो बांदा कारागृहात होता, अशी माहिती आहे. तर मुख्तार अन्सारीविरुद्ध उत्तर प्रदेश, पंजाब, नवी दिल्ली आणि इतर अनेक राज्यांमध्ये सुमारे 60 खटले प्रलंबित आहेत.