कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचे (Mukhtar Ansari) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुख्तार अन्सारी बांदा कारागृहात बंद होता. तेथे प्रकृती खालावल्यानंतर मुख्तारला उपचारासाठी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर अन्सारी (Umar Ansari) याने वडिलांना जेवणातून विष दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. (Mukhtar Ansari Death)
उमर अन्सारी म्हणाला की, माझ्या वडिलांना जेवणातून स्लो पॉयझन (Slow Poison) दिले जात होते. त्यामुळे आपण न्यायव्यवस्थेकडे जाणार आहे. यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तसेच वडिलांच्या मृत्यूबाबत मला प्रशासनाकडून काहीही सांगण्यात आले नाही, मला माध्यमांतून याची माहिती मिळाली. पण आता संपूर्ण देशाला सर्व काही माहित आहे. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना भेटायला आलो होतो, पण मला परवानगी दिली नव्हती.
स्लो पॉयझन दिल्याच्या आरोपावरून आम्ही यापूर्वीही हेच बोललो होतो आणि आजही तेच बोलू. 19 मार्च रोजी रात्रीच्या जेवणात त्यांना विषबाधा झाली होती. त्यामुळे आता आम्ही न्यायव्यवस्थेकडे जाऊ, त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे उमर अन्सारी म्हणाला. पुढे तो म्हणाला की, उद्या पोस्टमॉर्टम केले जाईल, त्यानंतर ते आम्हाला मृतदेह देतील. यानंतर आम्ही पुढील प्रक्रिया (अंत्यसंस्कार) करू. मला स्लो पॉयझन दिल्याचा आरोप माझ्या वडिलांनी केला होता. शवविच्छेदन करण्यासाठी सुमारे पाच डॉक्टरांची समिती तयार करण्यात आली आहे. तर सध्या मुख्तार अन्सारीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बांदा येथील बांदा मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मुख्तार अन्सारी मऊ विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. ज्यामध्ये तो दोन वेळा बहुजन समाज पक्षाचे उमेदवार होता. तर त्याच्या गावी गाझीपूरमध्ये त्याचा खोल प्रभाव होता. तसेच अनेकवेळा मढचे आमदार राहिलेला मुख्तार अन्सारी हा विविध खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असून तो बांदा कारागृहात होता, अशी माहिती आहे. तर मुख्तार अन्सारीविरुद्ध उत्तर प्रदेश, पंजाब, नवी दिल्ली आणि इतर अनेक राज्यांमध्ये सुमारे 60 खटले प्रलंबित आहेत.