काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांना लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अमोल किर्तीकर हे रिंगणात उतरलेले असतानाच ते अडचणीत आले आहेत. कारण त्यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स (ED Notice) बजावलं आहे.
अमोल किर्तीकर यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले असून त्यांना 8 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. किर्तीकरांना कोरोना काळातील खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे.
याआधी अमोल किर्तीकरांना ईडीने शॉर्ट नोटीस देऊन समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी किर्तीकर चौकशीसाठी गैरहजर राहीले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते गैरहजर राहीले असल्याची माहिती वकील दिलीप साटलेंनी दिली होती. तसंच वकिंलाकडून पत्र देऊन किर्तीकर हजर राहण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचंही वकिलांनी सांगितंलं होतं. तर आता आज ईडीने किर्तीकरांना दुसरं समन्स बजावलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोविड काळात तत्कालीन सरकारनं गरिब स्थलांतरित कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत स्वत:चे घर नाही अशा लोकांची जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला होता. तर या गरिब, स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरूवातीच्या 4 महिन्यांमध्ये 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले होते, असे मनपाने सांगितले आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.