लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार आणि सहकारी आमदारांनी खासदारांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीमध्ये सत्तेत सहभाग घेतला. अजित पवारांबरोबर प्रफुल पटेल देखील महायुतीमध्ये सामील झाले आहेत. दरम्यान २०१७ मध्ये सीबीआयने प्रफुल पटेल यांच्याविरोधात नोंदवलेला भ्रष्टाचाराचा गुन्हा बंद केला आहे. नेमके हा गुन्हा काय होता त्याबद्दल जाणून घेऊयात.
सीबीआयने २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एअर इंडियासाठी विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. सुमारे सात वर्षे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सीबीआयने प्रफुल्ल पटेल आणि एमओसीए आणि एअर इंडियाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना क्लीन चिट देऊन तपास बंद केला असल्याचे वृत्त समोर येत आहे. १९ मार्च रोजी कोर्टासमोर क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.
तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री, प्रफुल्ल पटेल यांनी एमओसीए, एअर इंडिया आणि खासगी अधिकाऱ्यांसह तत्कालीन सार्वजनिक वाहक एअर इंडियासाठी मोठ्या प्रमाणात विमाने भाडेतत्त्वावर घेण्याचा कट रचून आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मात्र आता सीबीआयने त्यांच्यावरील गुन्हा मागे घेतला आहे. या संदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. तसेच सध्या प्रफुल पटेल हे राज्यसभेचे खासदार आहेत.