भाजपने (BJP) अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्याविरोधात कोण उभं राहणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तर आता प्रहार पक्षाकडून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नवनीत राणांविरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे.
ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब (Dinesh Bub) यांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तर आता प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषीत केलं आहे. त्यामुळे आता अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्याविरोधात दिनेश बूब लढणार आहेत.
याबाबत प्रहार संघटनेचे आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अमरावती मतदारसंघातून संघटनेचा उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दिनेश बूब यांना निवडणुकीत उतरवलं आहे.
उमेदवारी मिळाल्यानंतर दिनेश बूब म्हणाले की, मी आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेत आहे. आजचा दिवस खूप भावनिक आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत आहे. तसेत अमरावती हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. पण मला एक वर्षांपूर्वी अरविंद सावंत यांनी सांगितलं की, इथे शिवसेनेच काम नाही आणि हा मतदारसंघ काँग्रेसला गेला. तसेच अनेक लोकांनी मला फोन केले की तुम्ही निवडणुकीत उभे राहा. मला काँग्रेस, भाजप, शिवसेना, प्रहार, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोन केले आणि निवडणुकीत उभे राहायला सांगितलं आहे.
जर मला निवडणुकीत निवडून दिलं मतदारांना अभिमान वाटेल. कारण जिल्ह्याच्या हितासाठी मी निवडणुकीत उभा आहे. तसंच शिवसेनेचा मी राजीनामा दिलेला नाही, शिवसेनेला मी मनातून काढू शकत नाही. कारण शिवसेना माझ्या रक्ता रक्तात आहे. जर शिवसेनेनं मला पक्षातून काढलं तर तो त्यांचा अधिकार आहे, असेही दिनेश बूब म्हणाले.