महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) नेत्या मीनाक्षी पाटील (Meenakshi Patil) यांचे आज (29 मार्च) पहाटे अलिबाग येथील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर मीनाक्षी पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी अलिबाग येथील पेझारी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अलिबागच्या माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील या शेतकरी कामगार पक्षाच्या लढवय्या नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. मीनाक्षी पाटील या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा होत्या. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून त्या तीन वेळा आमदार होत्या.
तत्कालीन विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात 1999 मध्ये त्या राज्यमंत्री होत्या. मीनाक्षी पाटील या शेकाप आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या बहिण, शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या आई होत्या. मीनाक्षी पाटील यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. अभ्यासू नेत्या म्हणून मीनाक्षी पाटील यांचा लौकिक आहे.
मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल शरद पवार म्हणाले, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. रायगड जिल्ह्यातील किसान मजदूर पक्षाच्या खंबीर नेत्या म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. प्रत्येक सार्वजनिक आंदोलनात त्या आघाडीवर होत्या. मीनाक्षीताईंच्या निधनाने राजकीय क्षेत्राने एक बुद्धिमान, कुशल आणि लोकाभिमुख नेता गमावला आहे.