कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचे (Mukhtar Ansari) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुख्तार अन्सारी बांदा कारागृहात बंद होता. तेथे प्रकृती खालावल्यानंतर मुख्तारला उपचारासाठी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर अन्सारी (Umar Ansari) याने वडिलांना जेवणातून विष दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. (Mukhtar Ansari Death) दरम्यान आता मुख्तार अन्सारीच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे. त्याप्रमाणे तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशी होणार आहे.
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी होणार आहे. बांदा येथील सीजेएम या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. मुख्तारच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा स्थितीत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी शुक्रवारी माफियातून राजकारणी झालेले मुख्तार अन्सारी यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
अन्सारीचे नाव न घेता, उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शुक्रवारी पोलीस आणि न्यायालयीन कोठडीतील मृत्यूंवर प्रश्न उपस्थित केला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी केली. सपा प्रमुख अखिलेश यादव शुक्रवारी ‘X’ वर म्हणाले, “प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक ठिकाणी एखाद्याच्या जीवाचे रक्षण करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. आता चौकशीची मागणी करण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणाची न्यायलयीन चौकशी केली जाणार आहे. मुख्तार अन्सारी मऊ विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. ज्यामध्ये तो दोन वेळा बहुजन समाज पक्षाचे उमेदवार होता. तर त्याच्या गावी गाझीपूरमध्ये त्याचा खोल प्रभाव होता. तसेच अनेकवेळा मढचे आमदार राहिलेला मुख्तार अन्सारी हा विविध खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असून तो बांदा कारागृहात होता, अशी माहिती आहे. तर मुख्तार अन्सारीविरुद्ध उत्तर प्रदेश, पंजाब, नवी दिल्ली आणि इतर अनेक राज्यांमध्ये सुमारे 60 खटले प्रलंबित आहेत.