देशात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच देशामध्ये आचारसंहिता देखील लागू झाली आहे. ७ टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. इंडी अघईड आणि एनडीएने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात देखील भाजपा आणि काँग्रेस पक्षाने आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान काँग्रेसने सोलापुरातून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने सोलापूरमध्ये माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. आता पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंवर टीका केली.
काँग्रेसची सत्ता असताना भगवा दहशतवाद हा शब्द यांनीच आणला. हिंदूंना दहशतवादी म्हटले, नी आता मंदिरांना भेटी देत आहेत हे वीट आणणारे आहे, अशा प्रकारची टीका राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंवर केली आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे. सोलापूरच्या युवकाला रोजगार मिळाला पाहिजे, येथे आयटी पार्क झाले पाहिजे. उद्योग आले पाहिजे, टेक्सटाईल पार्क झाले पाहिजेत. सोलापुरात मोठ्या प्रमाणात सोलापूरला जोडणारे ४० हजार कोटींचे रस्ते आमच्या सरकारच्या काळात झाले. काँग्रेसने मागच्या ७० वर्षात कांहीच दिले नाही. त्यामुळं आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलूया, मी विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये लेटर वॉर पाहायला मिळाले. प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्वागत असल्याचे म्हटले आहे. पुढील ४० दिवस आपण भान राखून लोकशाहीचा आदर राखून आपण विचारांची लढाई विचारांनी लढूया. हे शहर सर्वधर्मसमभाव मानणारे आहे. समाजाच्या विकासासाठी लढाई लढूया. असे आपल्या पत्रात प्रणिती शिंदे यांनी लिहिले आहे. दरम्यान या पत्राला देखील राम सातपुते यांनी चोख उत्तर दिले आहे.