▪️भारत शासनाने २०२२ ते २०४७ हा २५ वर्षांचा कालावधी ‘अमृत काल’ म्हणून घोषित केला आहे. या कालावधीत भारत देश २०४७ पर्यंत विकसित देश म्हणून गणला जाईल याचा प्रयत्न देशातील प्रत्येक स्त्री, पुरुष, बालक यांनी करावयाचा आहे. तसेच मानव जात सुखाने आपले जीवन जगू शकेल असा जीवन संदेश प्रत्यक्ष कृतीने जगातील सर्व राष्ट्रांना द्यावयाचा आहे.
याच कालवधीत भारताने ‘चिरस्थायी सुखाच्या मार्गाने विकसित होऊन दाखविणे’ हे आव्हानात्मक काम या अमृत काळात करावयाचे आहे. मात्र यावेळी एका बाजूस अचंबित करणारी तांत्रिक प्रगती व दुसऱ्या बाजूस संपूर्ण मानव जात सुखाचा शोध घेता घेता एका खोल गर्तेत सापडली आहे हे वास्तव आहे.
▪️मानवी इतिहासातील सर्वात आवाहनात्मक कार्य म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्ती अनादी कालापासून सुखाचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. हे काम इतके कठीण का वाटते? व्यक्ती, समाज व शांतता यांचा परस्पर संबंध काय आहे हे समजण्यात आपण काही चूक करतो का? अनेक शतके प्रयत्न करून आपण भौतिक विकास साधत आहोत पण सम्पतीची हाव काही कमी होत नाही. तंत्रज्ञानाने अचंबित करणार्या सुधारणा झाला आहेत पण सार्वत्रिक अशांतता कमी नाही. एका बाजूने शाश्वत विकास साधला गेला पहिजे व दुसर्या बाजूस जीवन सहज व शांतता पूर्ण होईल हे कसे साध्य करावयाचे ?
▪️या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन मानवतेने आपले जीवन संपूर्ण आनंदाचे, शांततापूर्ण. नीतीने जीवन कसे चालवावे याचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न म्हणजे ‘एकात्म मानव दर्शन’ हे भाष्य आहे.
▪️पश्चिमी विचार प्रवाहांचा परिणाम
आज महत्वाचा प्रश्न हा आहे की भारतीय तत्वज्ञानास मागासलेले, पुरातन ठरवून पश्चिमी विचार सर्व श्रेष्ठ आहे असा डंका पिटवून काय साध्य झाले आहे ?. गेल्या शतकातील दोन महायुद्धे, नैसर्गिक संसाधनाचा अमाप वापर, गरीब राष्ट्रांची पिळवणूक, सामाजिक असमतोल, नक्षल वाद, समाजात निर्माण झालेले मानसिक व शारीरिक तणावाचे प्रश्न, आतंकवाद, अमली पदार्थांचा अमाप वापर, आत्महत्या, काही निवडक जणांचे हाती राजकीय शक्तींचे ध्रुवीकरण, धर्म बदला करिता कारस्थाने, कुटुंब व्यवस्थेच्या अवमूल्यनामुळे घटस्पोट संख्येत वाढ हेच या प्रश्नाचे उत्तर आहे का?. हे सर्व शास्त्रीय व तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा परिणाम आहे असे म्हटले जाते. पण ते खरे आहे का?.
▪️भारतात सनातन धर्माच्या अवलम्बनाचे वेळी समाजात शांतता नांदत होती. संपूर्ण जग परस्पर सहजीवनाचा आनंद घेत होती. पर्यावरणाची काळजी घेतली जात होती. आणि त्याच वेळी शास्त्रीय व तंत्रज्ञानात प्रगती होत होती. हे कसे शक्य होत होते हा सध्या भारतात आणि जगात अभ्यासाचा विषय बनून राहिला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी १९६५ मध्ये मांडलेले ‘एकात्म मानव दर्शन हा अशा अभ्यासाचा एक महत्वाचा मैलाचा दगड आहे.
▪️एकात्म मानव दर्शन : एक सुलभ उत्तर
मानवतेचे चिरंतन टिकणारे सर्वंकष सुख हे ध्येय धरून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अनेक विचार प्रवाहांचा सखोल अभ्यास केला. राजेशाही, समाजवाद, साम्यवाद, धर्म निरपेक्षता , लोकशाही या सर्व राजकीय पद्धतींच्या प्रयोगांचा गेल्या काही शतकांचा अभ्यास केला. भारतास स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. तत्पूर्वी जगात या सर्व राजकीय विचार प्रवाहांचे उगम, त्यांचा प्रत्यक्ष वापर जगात अनेक देशात झाले. त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला. स्वतंत्र भारताने १९६५ पर्यंत अवलम्बिलेल्या धोरणांचा अभ्यास केला. सर्व अभ्यासाचा परिपाक म्हणून त्यांनी एप्रिल १९६५ मध्ये मुंबई येथे चार व्याख्यानाद्वारे आपले विचार स्पष्ट केले. ते विचार पुढे Integral Humanism (‘एकात्म मानव दर्शन’) म्हणून मान्य झाले. हे भाष्य केवळ भारतास आपला राजकीय प्रवासाची धोरणे ठरविण्यास उपयुक्त ठरणारी होती असे नव्हे तर त्या भाष्याचा उपयोग मानवतेस चिरंतन सुख , समाधान देणारी धोरणे राबविण्यास साहायाकारी ठरणारी होती.
▪️मात्र या दर्शनाच्या उगमानंतर तीन वर्षात पंडित दीनदयाळ यांचा जीवन प्रवास संपुष्टात आला व एकात्म मानव दर्शन’ या विचार प्रवाहाच्या प्रसारास खीळ पडली. शिवाय या विचार प्रवाहाचा विचार करण्यास योग्य अशी राजकीय परिस्थिती भारतात नव्हती. त्यानंतर ची ५० वर्षे ही संमिश्र सरकारांची होती. सहाजिक पणे अनेक विचार प्रवाहांच्या मिश्रणातून काम चलावू कार्यक्रम ठरविले जात होते.
▪️जागतिक पटलावर दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचे धक्के जाणवत होते. सोविएत युनियन चे १५ स्वतंत्र राष्ट्रात विभाजन, बर्लिन भिंत दूर होणे, संमिश्र स्वरूपात समाजवाद व साम्यवाद यावर आधारित धोरणाची अमलबजावणी अशा अनेक उलथापालथीमध्ये जगातील राष्ट्रे मग्न होती. जपान, जर्मनी, फ्रांस आदी राष्ट्रे दुसर्या महायुद्धानंतर पुनर्निर्माण कार्यात आपली एकात्म शक्ती पणास लावत होती. तुलनेने भारत या सर्व राष्ट्रांच्या बराच मागे राहिला होता.
▪️एकविसाव्या शतकाच्या सुरवातीस पश्चिमी राष्ट्रातही त्यांनी अवलंबिलेल्या विचार प्रवाहाच्या परिणामांचे सिंहावलोकन करण्याची क्रिया १९९५ पासून सुरू झाली होती. त्यानंतर २०१५ पर्यंत या सिंहावलोकन अभ्यास स्पष्ट करणारी अनेक पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यातील काही पुस्तकातून पंडित दीनदयाळ यांच्या दर्शनात उल्लेखिलेल्या संकल्पना संदर्भात पाश्चिमात्य लेखकांचे विचार काय आहेत याचा अभ्यास प्रा. नारायण गुणे यांनी २०१८ मध्ये इंग्लंड मधील न्यूकॅसल येथील नोर्दम्ब्रीया विद्यापीठाच्या वाचनालयात केला. ते सर्व संदर्भ या पुस्तकात समाविष्ट केले आहेत.
▪️पुस्तक रचना व उद्देश
पंडित दीनदयाळ यांच्या ४ व्याख्यानातून ६१ मुद्दे घेतले आहेत. त्यांची विभागणी खालील ७ भागात केली आहे.
1. अंतिम ध्येय प्राप्तीसाठी दिशा दर्शन
2. व्यक्ती व समाज एकात्म
3. राज्य व राष्ट्र परस्परावलम्बित
4. धर्म व रिलीजन हे एक नव्हे
5. सुखासाठी आर्थिक व्यवस्था
6. कल्याणकारी राज्य व कल्याणकारी समाज
7. अंतिम ध्येय प्राप्तीसाठी विराट दर्शन
▪️प्रत्येक मुद्याबाबत स्पष्टीकरण, भारतीय दार्शनिकांचे विचार, पश्चिमी विचारवंतांचा अभ्यास व एकात्म मानव दर्शन च्या विचारांचे प्रत्यक्ष कार्यात आज होणारे दर्शन व भविष्यात काय करता येईल याच्या सूचना यांचा समावेश आहे. प्रत्येक भागाचा सारांश व कळीचे शब्द दिले आहेत.
या पुस्तकात व्यक्ती, समाज, निसर्ग व अदृश्य शक्ती यांच्या गुणधर्मांचा विचार केला आहे. अनेक विचारवंतांच्या द्रीष्टीने मानव जातीस शाश्वत सुख, समाधान आनंद प्राप्त होण्यासाठी व्यक्ती व समाज यांनी कसा विचार करावा या बाबत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार उधृत केले आहेत. या बाबत विद्यार्थी, अध्यापक, समाज नेते, राजकीय नेते निश्चित विचार मंथन करत असतात . त्यांना हे पुस्तक उपयुक्त वाटले तर आम्हास आमच्या कामाचे सार्थक झाले असे वाटेल.
लेखक : नारायण गुणे पंकज जयस्वाल
प्रकाशक : मिहाना पब्लिशर्स पुणे मार्च २०२४
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे