दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांची कोठडी स्थानिक न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. तर त्यांना २१ मार्च रोजी त्यांना विशेष कोर्टाने ७ दिवसांची ईडी कोठडी दिली आहे. तर ईडीच्या अटकेविरुद्ध केजरीवालांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आम आदमी पक्षाचे नेते कैलाश गेहलोत यांनाही समन्स बजावले आहे. ईडीने त्याला आजच चौकशीसाठी बोलावले आहे. कैलाश गेहलोत सध्या दिल्ली सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत. या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक आप नेत्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
अलीकडेच दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी ‘इंडिया विथ केजरीवाल’ या टॅगलाइनसह केजरीवाल यांचे पोस्टर शेअर केले होते. ते म्हणाले, “संपूर्ण देश दिल्लीच्या सुपुत्राच्या पाठीशी उभा आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला जात आहे. देशाचे राजकारण बदलणाऱ्या कट्टर देशभक्ताला देशातील जनता एकटी सोडणार नाही. “
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत ‘केजरीवाल को आशीर्वाद’ (Kejriwal Ko Aashirwaad) नावाची व्हॉट्सॲप मोहीम सुरू केली आहे.सुनीता केजरीवाल म्हणाल्या, “आम्ही आजपासून ‘केजरीवाल को आशीर्वाद’ या मोहिमेला सुरुवात करत आहोत. तुम्ही या नंबरवर केजरीवाल यांना तुमचे आशीर्वाद आणि प्रार्थना पाठवू शकता. तुम्हाला हवा तो संदेश देखील पाठवू शकता.” “केजरीवाल यांनी कोर्टात आपली भूमिका मांडली आहे, ते खरे देशभक्त आहेत. पक्षवाद त्यांच्या शिरपेचात आहे. अरविंद यांनी देशातील सर्वात शक्तिशाली शक्तींना आव्हान दिले आहे, या लढ्यात तुम्ही तुमच्या भावाला साथ देणार नाही का?” असेही सुनीता केजरीवाल म्हणाल्या.