लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे नेते शिवराज पाटील (Shivraj Patil) चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan), बसवराज पाटील यांच्यापाठोपाठ अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का समजला जात आहे. या प्रवेशामुळे मराठवाड्यातून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या आणखी वाढणार आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), तसेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला आहे.
मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती.त्यानंतर मागील महिन्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे कट्टर समर्थक मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ही अस्वस्थता आणखी वाढली. होती. येत्या काळात काँग्रेसमध्ये फक्त अमित देशमुख गटाचे वर्चस्व मराठवाड्यात असणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता अर्चना पाटील चाकूरकर यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपची वाट धरल्याचे बोलले जात आहे.तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत अमित देशमुखांविरोधात अर्चना पाटील चाकूरकर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा आहे.
भाजपमध्ये पक्षप्रवेश करतांना अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या की, “ मोदी साहेबांचा प्रवास आम्ही बारकाईने बघत होतो. संसदेतले पहिले महिला विधेयक पारीत झाले. तो एक ऐतिहासिक निर्णय होता. आरक्षणामुळे महिलांना संधी मिळेल.त्यामुळे फडणवीस जी कामगिरी देतील ती १०० टक्के नीट पार पाडेन” असे त्या म्हणाल्या आहेत.
या प्रवेशामुळे लातूर ,धाराशिव, नांदेड या जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलतील असे मानले जाते. शिवराज पाटील चाकुरकर यांचे पाठीराखे खूप आहेत. ते मतदान भाजपच्या पदरी पडेल, असा दावा केला जात आहे.मात्र या सगळ्या घडामोडींदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसलेली नाही.