महाविकास आघाडीमध्ये मंत्री असणारे नवाब मलिक हे दाऊदशी संबंधित प्रकरणामध्ये तुरुंगात होते. त्यावेळेस विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण अत्यंत जोरदारपणे लावून धरले होते. माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांना रुग्णालयात कोणत्या कारणांमुळे दाखल करण्यात आले आहे, ते अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाल्यावर त्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. काही महिन्यांपूर्वी ते तुरूंगातून बाहेर आले आहेत. मात्र प्रकृतीमुळे ते कार्यक्रमांमध्ये फारसे उपस्थित नसतात.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. नवाब मलिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून ६ महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मलिक हे दोन महिन्यांच्या जामिनावर बाहेर आहेत. पण आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन ६ महिन्यांनी वाढवला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फेब्रुवारी 2022 पासून नवाब मलिक हे तुरूंगात होते. मात्र, तुरूंगात असताना त्यांना मूत्रपिंडाचा विकार झाला आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी 2 महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर नवाब मलिकांनी पुन्हा जामिनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. तर आता न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य करत त्यांना सहा महिन्यांसाठी जामीन दिला आहे. नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जामीन वैद्यकीय आधारावर मंजूर करण्यात आला आहे.