भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो.या सणांना भौगोलिक, सामाजिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. रंगपंचमी हा सण फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जातो.
शास्त्रात, रंगपंचमी ही वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय अथवा दुःखावर मात करत आनंदाकडे वाटचाल करणारा सण म्हणून मानला जातो.
या काळात सृष्टीत अनेक बदल होत असतात. झाडाची सुकलेली पाने गळून सृष्टीला नवी पालवी फुटत असते.शिशिराळा मागे टाकत वसंत उत्साहाने पुढे येतो. त्यामुळे निसर्गातही रंगाची उधळण सुरू असते. याचं एक प्रतिक म्हणून रंगपंचमी साजरी केली जाते.शिवाय या काळात उन्हाची काहिली वाढू लागलेली असते. त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणात होणारा दाह कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
असं म्हणतात की उन्हाचा दाह कमी करण्यासाठी द्वापारयुगात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बालपणी गोपगोपिकांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करीत असतं. आजही आधी देवपूजा करून श्रीकृष्णाला रंगाचा टिळा लावून, वडीलधाऱ्या माणसांचा आर्शीवाद घेऊन रंग खेळण्यास सुरुवात करतात.
या दिवशी आपापसातील मतभेद दूर करून सर्वजण एकत्र येतात. सर्वांना एकत्र आणण्यासाठीच या सणाची निर्मिती केली गेली असावी.भारतामध्ये हा सण विविध पद्धतीने साजरा होतो. कोकणा मध्ये देवाची पालखी निघते, उत्तर भारतामध्ये बलराम आणि कृष्ण मंदिरात पूजा होते. अनेक उत्सव साजरे होतात. लोकगीते गायली जातात.
मणिपूर मध्येही हा सण कसा साजरा होतो पहा. मणिपूर हे ईशान्य भारतातील एक सुंदर राज्य आहे. हे राज्य मंत्रमुग्ध करणाऱ्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि समृद्ध वारशासाठी ओळखले जाते. हे राज्य आपल्या धार्मिक आकांक्षा आणि संस्कृतीचा भाग म्हणून अनेक सण साजरे करते.
याओसांग हा मणिपूरमध्ये वसंत ऋतूमध्ये पाच दिवस साजरा केला जाणारा सण आहे , जो लामडा महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी (फेब्रुवारी-मार्च) सुरू होतो. याओसांग ही मेतेई लोकांची स्थानिक परंपरा आहे .
हा मणिपूरमधील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो.
याओसांग, ज्याला कधीकधी बर्निंग ऑफ द स्ट्रॉ हट म्हणून संबोधले जाते, ते संध्याकाळनंतर सुरू होते . या पाच दिवसांमध्ये संध्याकाळी पारंपारिक “थबल चोंगबा” नृत्य आणि दिवसा खेळाच्या कार्यक्रमांनी मणिपूर जिवंत होते. थाबल चोंगबा नावाच्या ठराविक मीतेई नृत्यात मुलं आणि मुली मोकळ्या मैदानावर वर्तुळात नाचतात. थाबल चोंगबा आता लामता महिन्यात सर्वत्र सादर केले जाते. .
याओसांगची सुरुवात प्रत्येक गावात सूर्यास्तानंतर याओसांग मेई थाबाने होते , किंवा लामता महिन्याच्या मणिपुरी महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री स्ट्रॉ हट बर्निंग होते . मग मुले प्रत्येक घरी आर्थिक देणग्या मागतात, ज्याला नाकथेंग म्हणतात . दुसऱ्या दिवशी, मणिपूरच्या इम्फाळ-पूर्व जिल्ह्यातील गोविंदगी मंदिरात स्थानिक बँडचे गट संकीर्तन करतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मुली नाकाथेंग करण्यासाठी नातेवाईकांकडे जातात आणि पैसे गोळा करण्यासाठी दोरीने रस्ता अडवतात. चौथ्या आणि पाचव्या दिवशी लोक एकमेकांवर पाणी ओततात किंवा शिंपडतात. टग ऑफ वॉर आणि सॉकर यासारख्या अनेक क्रीडा स्पर्धांचेही या निमित्ताने आयोजन करण्यात येते . याशिवाय सणासुदीत स्थानिक पदार्थ शेजाऱ्यांसोबत शेअर केले जातात. हा सण “नाकाथेंग” म्हणून ओळखला जातो. .
एकूणच काय तर जीवनातील रंगाची मजा लुटा आणि आनंदी राहा आणि आपले जीवनही रंगांप्रमाणे इतरांना आंनद देणारे होऊ दे , असा संदेश देणारा हा सण लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत आणि संपूर्ण देशात सर्वानाच आवडणारा सण आहे.
अमृता बदामीकर ,सोलापूर.
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत