लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु झाला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांनी काही जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत जास्त चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. कारण अजित पवार त्यांच्या सहकारी आमदारांसह काही महिन्यापूर्वी शरद पवारांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील झाले. त्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार हे जवळपास निश्चित आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र या दोघांमध्ये पुरंदरचे शिवसेनेचे नेते आणि अजित पवारांचे विरोधी विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये अपक्ष उभे राहणार असल्याचे जाहीर केले. आता शिवतारेंबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
विजय शिवतारे यांनी बारामतीची निवडणूक अपक्ष लढविण्यावर ठाम होते. त्यामुळे अजित पवार आणि महायुतीचे टेन्शन वाढले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईने विजय शिवतारेंनी आता बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुंबईत शिंदे, फडणवीस, पवारांमध्ये आणि शिवतारेंमध्ये झालेली बैठक यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
देशामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. दरम्यान ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी म्हणजेच निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान एनडीए आणि इंडी आघाडीने प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच भाजपा आणि अनेक इतर पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये अजूनही महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीये. दरम्यान बारामतीमध्ये यंदा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.