नागपुरातील जनार्दन मून नामक इसमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काँग्रेसला पाठिंबा आहे असा व्हिडीओ युट्यूबवर जारी करून देशभर संभ्रम पसरवला. याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पोलिसात आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. संघाचे नागपूर महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे यांनी संघातर्फे ही तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली असून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारे संघटन जगप्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी जनार्दन मून याने संघ नोंदणीकृत नसल्याचा दावा करत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ याच नावाने संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच सहायक निबंधक कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नावाने संघटना स्थापन करण्याची परवानगी मागितली. परंतु, त्याला सहायक निबंधक कार्यालयाने परवानगी नाकारली. त्यानंतर जनार्दन मून यांने उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, 2019 मध्येच दोन्ही न्यायालयांनी त्याची याचिका नामंजूर केली होती. वर्तमानात जनार्दन मून याच्या नावे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाची कुठलीही संस्था नोंदणीकृत नाही. असे असताना मून वारंवर आरएसएसचे फलक लावून कार्यक्रम करतो आणि पत्रकार परिषदा घेतो.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार क्लब ऑफ नागपूर येथे 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता जनार्दन मून याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बॅनर लावून पत्रकार परिषद घेतली. तसेच भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी संघ यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. तसेच या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड केला. त्यावरून संघ काँग्रेसच्या समर्थनात प्रचार करीत असल्याचा संभ्रम जगभर पसरला. तसेच या व्हिडीओच्या आधारे बातम्या देखील प्रकाशित झाल्यात. याची दखल घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर पोलिस आयुक्तालयात तक्रार करून जनार्दन मून विरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच संघाचा राजकारणाशी संबंध नसताना संघाचे नाव वापरून केलेल्या अपप्रचाराबद्दल निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. तसेच निवडणूकीच्या काळात संघाच्या नावावर अशा फेक पोस्ट आल्या तर त्यापासून सावध रहावे. संघाची अधिकृत भूमिका केवळ त्यांचा अधिकृत ट्विटर हॅंडल किंवा संकेतस्थळावरच मांडण्यात येते असे संघाच्या प्रचार विभागाने स्पष्ट केले आहे.