सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी 12 अतिरेक्यांना वाचवायचं काम केलं होतं, असा आरोप राम सातपुते यांनी केली आहे. ते सोलापूर मतदारसंघातील मंगळवेढा येथे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी घेतलेल्या बैठकीत बोलत होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राम सातपुते म्हणाले, मुख्यमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी दहशतवाद प्रतिबंध कायद्यानुसार अडकलेल्या सोलापूरच्या 12 अतिरेक्यांना वाचवायचं काम केलं होतं. हवं तर मी त्याची यादी देतो. सोलापूरसाठी त्यांनी काय काम केले आहे असा सवाल करत सोलापूर भकास करून दक्षिण आफ्रिका आणि नॉर्थ ईस्टमध्ये यांनी स्वत:चे चहाचे मळे सुरू केले आहेत, असा आरोप सातपुतेंनी केला आहे.
आजपर्यंत 75 वर्षात कोणी हिंदूंना आतंकवादी म्हणायचे धाडस केले नव्हते, ते या सुशीलकुमार शिंदेंनी केले आहे. ते सोलापूरचे कलंक आहे, अशी टीकाही राम सातपुतेंनी केली.
पुढे सातपुतेंनी प्रणिती शिंदेंवर निशाणा साधला. महिन्यातून फक्त दोन दिवस मतदारसंघात यायचं आणि एकदाच फोटो काढायचा. तसंच तो फोटो तिकेड पंधरा दिवस दाखवत भेटी दिल्याचं दाखवण्याचं काम ताईने केलं आहे. पण मी असले धंदे करत नाही, अशी टीकाही सातपुतेंनी केली.