आज (31 मार्च) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचे 28 पक्ष दिल्लीमध्ये एकत्र आले आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी जनतेला संबोधित केलं. तसंच त्यांनी केजरीवालांनी जनतेला दिलेल्या सहा गॅरंटी देखील वाचून दाखवल्या.
अरविंद केजरीवालांचा संदेश वाचून दाखवताना सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, केजरीवाल हे एक सच्चे देशभक्त आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांना ईडीने तुरूंगात टाकलं आहे पण ते त्यांन जास्त काळ तुरूंगात ठेवू शकणार नाहीत. कारण स्वातंत्रसंग्रामात ज्या पद्धतीने लोकांनी बलिदान दिलं त्याप्रमाणे केजरीवाल देशासाठी काम करत आहेत.
पुढे सुनीता केजरीवालांनी अरविंद केजरीवालांचा संदेश वाचून दाखवला. आज मी तुम्हाला मत मागत नाही तर एक नवा भारत बनवण्यासाठी मी मदत मागत आहे. 140 कोटी नागरिकांना मी नवा भारत करण्यासाठी निमंत्रण देत आहे. भारत हा गौरवशाली देश असून याला हजारो वर्षांता इतिहास आहे. तरी आपल्या देशातील लोक गरीब का आहेत? असं सुनीता म्हणाल्या.
आपण एका नव्या भारताचे स्वप्न पाहूया. सर्वा लोकांना रोजगार मिळेल आणि कोणी गरीब राहणार नाही. सर्वांना मोफत आणि चांगले उपचार मिळतील. प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. गावागावामध्ये चांगले रस्ते असतील. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात 24 तास वीज असेल. भारत विज्ञानात अग्रेसर असेल. तर आपण असा देश बनवूया जिथे सर्वजण समान असतील, असा केजरीवालांचा संदेश सुनीता यांनी वाचून दाखवला. तसंच त्यांनी केजरीवालांनी तुरूंगातून जनतेला दिलेल्या सहा गॅरंटी सांगितल्या.
केजरीवालांनी दिलेल्या सहा गॅरंटी
1. प्रत्येक गावात मोहल्ला क्लिनिक बनवले जाईल. तसेच प्रत्येक जिल्हायत मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल बनवले जाईल.
2. देशात चोवीस तास वीज पुरवठा देण्यात येईल, कुठेही पॉवर कट होणार नाही.
3. संपूर्ण देशात गरीब लोकांचे वीज बील मोफत असेल.
4. प्रत्येक गावामध्ये चांगली शाळा बनवली जाईल. सर्वांना चांगले शिक्षण मिळेल.
5. सर्व शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या एमएसपीनुसार धान्याला दर दिले जातील.
6.दिल्लीतील लोकांनी 75 वर्ष अन्याय सहन केला आहे. त्यांनी निवडून दिलेले सरकार पंगू आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकांना न्याय मिळवून देणार आहे आणि दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देणार आहे.