आज (31 मार्च) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी जनतेला संबोधित करताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपमध्ये भ्रष्टाचारी लोक आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच त्यांनी भाजपला खुलं आव्हान देखील दिलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी इथे निवडणूक प्रचारासाठी आलो नाही तर लोकशाहीसाठी आलो आहे. भाजपमध्ये सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं भविष्य कुणाच्या हातात देणार? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेऊन त्यांच्यावरचे आरोप पुसून टाकले. अशा या भ्रष्ट लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? आपण किती दिवस हे सहन करायचं. एक व्यक्ती आणि एका पक्षाचं सरकार देशासाठी धोकादायक आहे आणि आता या पक्षाचं सरकार पाडण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरेंनी भाजपला खुलं आव्हान दिलं. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा की, ईडी, आयटी डीपार्टमेंट आणि सीबीआय भाजपचे तीन साथी पक्ष आहेत. केजरीवाल यांच्यावर आरोप लावून त्यांना तुरूंगात टाकलं. हेमंत सोरेन यांच्यावरही आरोप करत त्यांना तुरूंगात टाकलं. ही कोणती पद्धत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.